बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून गटारी साफ न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे.
गावातील गटारी तुंबल्याने त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, गावात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तुंबलेल्या गटारींमध्ये गवत, कचरा आणि लहान-मोठी झुडपे उगवली आहेत, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, काही ठिकाणी गटारींजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे नळाद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्यास भाग पडत असून, साथीचे आजार पसरण्याची भीती वाढली आहे. या सर्व गंभीर बाबींकडे शिरसाळा ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देऊन गटारींची स्वच्छता करावी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुधारावी, अशी मागणी संतप्त गावकऱ्यांकडून केली जात आहे. जर ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले, तर गावातील आरोग्य परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.



