मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आनंदराज आंबेडकर यांनी आज शिवसेनेसोबत युती करण्याची घोषणा केली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ही महत्वाची घडामोड मानली जात आहे.
राज्याच्या राजकारणात एक मोठा आणि धक्कादायक निर्णय घेत, रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करण्याची औपचारिक घोषणा केली. ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे युती जाहीर केली. “शिंदे हे समावेशक नेतृत्व करत असून, आम्ही कुठल्याही अटीशिवाय त्यांच्यासोबत युती करत आहोत,” असे स्पष्ट करत आंबेडकर यांनी हा निर्णय सामाजिक न्यायासाठी असल्याचे सांगितले. त्यांनी हेही नमूद केले की, चळवळीतील कार्यकर्त्यांना सत्तेत स्थान मिळावं, हीच आमची भूमिका आहे आणि ती शिंदे सरकार पूर्ण करीत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त करत म्हटलं, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्हीही जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्या सेना आहेत. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची वारसदार सेना, तर दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताची सेना एकत्र आली आहे.”
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “मी मुख्यमंत्री झालो याचे श्रेय संविधानालाच आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सामान्य माणसालाही सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. म्हणूनच संविधानाची जपणूक करणे ही आपली सामाजिक बांधिलकी आहे.”
या युतीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांनी युतीची घोषणा करून राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडवून आणला आहे. सामाजिक न्याय आणि घटनेच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित ही युती भविष्यातील निवडणुकांवर दूरगामी परिणाम घडवू शकते.



