Home Uncategorized विहिरीत पाय घसरून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विहिरीत पाय घसरून ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दहिगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक १५ जुलैच्या पहाटे घडली. यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून मृत तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यावल पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव (ता. यावल) येथील प्रदीप घनश्याम महाजन (वय ३५) हे आपल्या नेहमीच्या कामानुसार मोहराळे, ता. यावल या गावाच्या शिवारातील बाळू रघुनाथ पाटील यांच्या शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. पहाटेच्या सुमारास विहिरीजवळ काम करत असताना अचानक पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. विहिरीत पाणी भरलेले असल्याने प्रदीप यांचा त्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना इतक्या वेगाने घडली की कुणाला काही कळण्याआधीच त्यांचा श्वास घेणे थांबले.

या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यानंतर प्रदीप यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यावल पोलिस ठाण्यात पुरुषोत्तम छगन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिगाव पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी करीत आहेत.

प्रदीप महाजन यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक कार्यात नेहमी पुढे असलेले प्रदीप हे अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने गावातील अनेकांनी भावना व्यक्त केल्या आहेत.


Protected Content

Play sound