Home टेक्नोलॉजी शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले ; भारतीय अंतराळ इतिहासात नवे पर्व

शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले ; भारतीय अंतराळ इतिहासात नवे पर्व


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात मोलाचा टप्पा गाठत, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामधून १८ दिवसांच्या यशस्वी मोहिमेनंतर आज पृथ्वीवर सुखरूप परतले. अंतराळात मानवाच्या उपस्थितीच्या बाबतीत भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. शुक्ला हे अंतराळ स्थानकामध्ये वास्तव्य करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.

आज दुपारी भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारण ३ वाजता कॅलिफोर्नियामधील पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्याजवळ स्पेसएक्सच्या ‘ग्रेस’ या ड्रॅगन यानाने लँडिंग केलं. या यानामध्ये शुभांशू शुक्ला यांच्यासह आणखी चार आंतराळवीर होते. स्पेसएक्सच्या अॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत शुक्ला यांची ही अंतराळ सफर पार पडली. २५ जून २०२५ रोजी ते फाल्कन ९ रॉकेटच्या साहाय्याने ड्रॅगन यानातून अंतराळात गेले होते आणि २६ जूनला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये दाखल झाले.

या १८ दिवसांच्या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला यांनी ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेषतः अंतराळात माणसाच्या स्नायूंवर होणारा परिणाम, मानसिक आरोग्य आणि अन्नधान्य उगमासंदर्भातील प्रयोगांवर त्यांचा भर होता. या प्रयोगांच्या निष्कर्षांचा भविष्यातील दीर्घकालीन अंतराळ प्रवासासाठी मोठा उपयोग होणार आहे.

यान पॅसिफिक महासागरात उतरल्यावर संपूर्ण यंत्रणेनं युद्धपातळीवर कार्य करत सर्व अंतराळवीरांना सुरक्षितरीत्या यानातून बाहेर काढलं आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली. अंतराळातून परतल्यानंतर शरीरावर आणि मनावर होणाऱ्या परिणामांचं अचूक परीक्षण करण्यासाठी त्यांना पुढील १० दिवस क्वारेंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यांचं आरोग्य पूर्णतः स्थिर आहे, परंतु सतत वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

शुभांशू शुक्ला यांच्या या यशामुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर अंतराळ विज्ञानात आपली ठसठशीत उपस्थिती दाखवली आहे. केवळ वैज्ञानिकदृष्ट्या नव्हे तर प्रेरणादायी दृष्टिकोनातूनही ही मोहीम अनेक नव्या पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.


Protected Content

Play sound