Home Uncategorized  प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्धार — आ. अमोल जावळे

 प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्धार — आ. अमोल जावळे


रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरा’त नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीने परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आला. “शेवटच्या नागरिकापर्यंत योजना पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे,” असे ठामपणे सांगत आमदार अमोल जावळे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव उपस्थितांसमोर मांडली.

शिबिराचे आयोजन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते आणि त्यासाठी रावेर शहरातील माजी सैनिक हॉलची निवड करण्यात आली होती. आमदार जावळे यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन प्रत्येक स्टॉलवर जाऊन योजनांची माहिती घेतली. कृषी, घरकुल, पंचायत समिती, बालविकास प्रकल्प आदी विविध विभागांनी आपले स्टॉल उभारून शासकीय योजनांची माहिती व लाभ वितरण केले. या उपक्रमामुळे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळाला आणि त्यांच्या समस्या एका छताखालीच सोडवण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमादरम्यान काही नागरिकांनी आमदार जावळे यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे अनेकांना संवाद साधणे शक्य झाले नाही, याबाबत काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. तरीही शिबिराचा एकूण उद्देश सफल झाल्याचे चित्र दिसून आले.

या शिबिरास भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश धनके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, डॉ. संदीप पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष दुर्गेश पाटील व रविंद्र पाटील, अ‍ॅड. सूर्यकांत देशमुख, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख उमाकांत महाजन, हरलाल कोळी, उद्योग आघाडीचे अरुण शिंदे, नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष उमेश महाजन, पिपल्स बँकेचे चेअरमन दिलीप पाटील, निलेश सावळे, चंद्रकांत पाटील (के-हाळा), वासु नरवाडे, बाळा आमोदकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रशासनातर्फे प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, गटविकास अधिकारी विनोद मेढे, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित कदम, कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळवे, कृषी विज्ञान केंद्राचे संजय महाजन आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound