जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आशादीप शासकीय महिला वस्तीगृहात एका गतिमंद मुलीला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वस्तीगृहात तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर तब्बल सात दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. किरकोळ वादातून वस्तीगृहातीलच एका मुलीने गतिमंद मुलीला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रफिक तडवी यांनी तात्काळ चौकशी समिती नेमली. या चौकशीत वस्तीगृहाच्या अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या संदर्भातला चौकशी अहवाल महिला व बालविकास आयुक्तांकडे सादर केला जाणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी, एप्रिल महिन्यात याच आशादीप वस्तीगृहातून एक बांगलादेशी तरुणी फरार झाली असून तिचा अजूनही शोध लागलेला नाही. असे असतानाही, वस्तीगृहातील आणखी एका तरुणीला बेकायदेशीरपणे दोन दिवस बाहेर राहण्याची परवानगी दिल्याचा आणि याबाबत अधीक्षिका सोनिया देशमुख यांनी जिल्हा महिला व बालविकास विभागाला कोणतीही माहिती दिली नसल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, वस्तीगृहात दाखल असलेल्या एका बलात्कार पीडित तरुणीचे नाव उघड केल्याचा ठपकाही सोनिया देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे आशादीप वस्तीगृह सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.



