Home क्राईम मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात: एकाच कुटुंबातील चौघे ठार !

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात: एकाच कुटुंबातील चौघे ठार !


नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव शिवारात एक भीषण अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या एका कारवर वीज प्रकल्पाच्या राखेची वाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कार पूर्णपणे चेपली जाऊन मुंबईतील अंधेरी येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्य आणि चालक असे एकूण चार जण जागीच ठार झाले.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गरुडेश्वर येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमातून दर्शन घेऊन हे कुटुंब मुंबईला परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. कंटेनरचालकाने मद्यपान केले असल्याची माहिती असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

अंधेरी येथून गुरुपौर्णिमेच्या सोहळ्यासाठी मुंबई येथील बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात मुंबईहून अनेक गुरुबंधू आले होते. यातील नित्यानंद सावंत (वय ६२), विद्या सावंत (वय ६५), वीणा सावंत (वय ६८) या एकाच कुटुंबातील अविवाहित भाविक आणि त्यांचे चालक दत्तात्रेय अंब्राले (रा. मुंबई) हे कारमधून मुंबईला परतण्यासाठी निघाले होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास गरुडेश्वरहून निघाल्यानंतर काही मिनिटांतच महामार्गावर राख भरलेल्या कंटेनरने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि ती दगडी बॅरिकेड्समध्ये अडकली.

या अपघातात नित्यानंद सावंत, विद्या सावंत, वीणा सावंत आणि चालक दत्तात्रेय अंब्राले हे चौघेही जागीच ठार झाले. नित्यानंद सावंत हे मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त अधिकारी होते, तर विद्या सावंत महानगर टेलिफोन निगमच्या सेवानिवृत्त कर्मचारी होत्या. या भीषण अपघातामुळे अंधेरीतील सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound