Home Cities जळगाव वाघनगर, सावखेडा परिसारात समस्यांचा डोंगर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !

वाघनगर, सावखेडा परिसारात समस्यांचा डोंगर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघनगर आणि सावखेडा परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, पाणी, रस्ते, स्वच्छता, गटारी आणि वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्यांवरून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. महानगरपालिका प्रशासन वारंवार केलेल्या निवेदनांना आणि तक्रारींना दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाची दखल घेत, संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

स्थानिक रहिवाशी महिलांनी आपली कैफियत मांडताना सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात पाणीपुरवठा खंडित आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कचरा व्यवस्थापनाचेही तीनतेरा वाजले आहेत; कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचे नियमित नियोजन नाही, त्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

याशिवाय, परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडले असून, दळणवळण कठीण झाले आहे. गटारींची योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यांवर येते, ज्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीजपुरवठ्यातही वारंवार अडथळे येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

या सर्व समस्यांबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन आपली समस्या सविस्तरपणे मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ महानगरपालिका, महावितरण आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी संबंधित विभागांना वाघनगर आणि सावखेडा परिसरातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound