Home प्रशासन नगरपालिका मुक्ताईनगरच्या रस्त्यांवर अखेर दिलासा: प्रशासनाकडून मुरूम टाकण्यास सुरुवात!

मुक्ताईनगरच्या रस्त्यांवर अखेर दिलासा: प्रशासनाकडून मुरूम टाकण्यास सुरुवात!


मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची बातमी प्रसारित होताच नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील खड्डेमय, चिखलाने भरलेल्या रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. ‘मुक्ताईनगरमध्ये रस्त्यांची झाली चाळण; पावसात डबके, चिखल, अपघातांनी नागरिक त्रस्त’ ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ६ जुलै रोजी सकाळीच प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत या परिसरात मुरुम टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाच्या या तत्परतेचे स्वागत केले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गटारी आणि पाणीपुरवठा पाइपलाईनच्या कामांमुळे शहरातील अनेक प्रमुख रस्ते अक्षरशः उखडले होते. पावसाळ्यामुळे तर या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले होते आणि जागोजागी पाण्याचे डबके साचले होते. यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक अपघातही घडले होते, ज्यात काही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त होते. नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होता आणि सोशल मीडियावरही यावर जोरदार टीका सुरू होती.

या सर्व प्रकारामुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि नागरिकांच्या संभाव्य आंदोलनाचा इशारा देणारी बातमी स्थानिक पातळीवर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना आळा बसेल आणि वाहतुकीची कोंडीही कमी होईल अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, केवळ मुरूम टाकून न थांबता, या रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करून ते पूर्ववत करावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.


Protected Content

Play sound