Home Cities जळगाव ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’निमित्त सेंट्रल बँकेकडून डॉक्टरांचा सन्मान

‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’निमित्त सेंट्रल बँकेकडून डॉक्टरांचा सन्मान


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भारतात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यावर्षीचा विषय “बिहाइंड द मास्क: हू हील्स द हीलर्स” (Behind the Mask: Who Heals the Healers) हा डॉक्टरांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर केंद्रित होता. डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या कल्याणासाठी पाठिंबा दर्शवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमादरम्यान, डॉक्टरांना विशेष पुरस्कार देऊन त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आणि त्यांना सामोरे जाणाऱ्या आव्हानांवर चर्चा करण्यात आली. सेंट्रल बँकेच्या जळगाव जिल्ह्यातील सर्व ४३ शाखांमार्फत वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेने डॉक्टर्स आणि सामान्य नागरिकांसाठी असलेल्या विविध आरोग्यसंबंधित योजनांची माहिती देखील दिली.

या दिनाचे औचित्य साधून बँकेचे प्रादेशिक प्रमुख रमेश जेठानी आणि मुख्य व्यवस्थापक अभिषेक नंदेश्वर यांनी जळगाव जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांना भेट दिली. तेथे त्यांनी डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विशेष सत्कार केला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अशा उपक्रमांद्वारे समाजप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी वेळोवेळी सिद्ध करत असल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.


Protected Content

Play sound