जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाजवळ असलेल्या अशोका लिकर गॅलरी दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दारूच्या बाटल्या आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ४१ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (२ जुलै) सकाळी १० वाजता समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच दुकानात चोरीची ही दुसरी वेळ आहे. या प्रकरणी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दीपक बाळकृष्ण भंगाळे (रा. हनुमान नगर, भुसावळ) यांचे जळगावातील आकाशवाणी चौकाजवळ अशोका लिकर गॅलरी नावाचे दारूचे दुकान आहे. १ जुलै ते २ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाची खिडकी तोडून आत प्रवेश केला. दुकानातून दारूच्या बाटल्या आणि ४० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
ही घटना बुधवारी सकाळी १० वाजता दीपक भंगाळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही हेच दुकान चोरट्यांनी फोडून चोरी केली होती. आता ही दुसरी घटना असल्याने स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करत आहेत.