
पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील न्यू बालाजी नगर येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक राजेश ठाकूर उर्फ ईश्वर बाबा यांचा नुकताच जळगाव येथे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

पोलिसांना सहकार्य, अनेकांना जीवनदान
ईश्वर बाबा ठाकूर हे पारोळा शहरासह तालुक्यात आपत्कालीन परिस्थितीत किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नेहमीच पोलीस प्रशासनाला योग्य प्रकारे मदत करत असतात. गंभीर अपघातातील रुग्णांना तातडीने धुळे किंवा जळगाव येथील सरकारी व खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचवून त्यांनी आजवर अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या अहोरात्र सेवेमुळे त्यांना ‘रुग्णसेवक’ म्हणून ओळखले जाते.
‘स्वर्ग रथ’ सेवेतही सक्रिय
दोन-तीन महिन्यांपूर्वी पारोळा शहरात लोकवर्गणीतून ‘स्वर्ग रथ’ (अंतिम संस्कारासाठीचे वाहन) उपलब्ध झाला असून, ईश्वर बाबा ठाकूर त्यात चालक म्हणूनही निःस्वार्थ सेवा देत आहेत. यापूर्वीही त्यांना धुळे, जळगाव, संभाजीनगर, नाशिक, पुणे, मुंबई यांसारख्या विविध जिल्हास्तरांवरून १० ते १५ पुरस्कार मिळाले आहेत. कोरोना काळातही त्यांनी रुग्णवाहिका सेवा देऊन अनेकांचे जीव वाचवले होते.
सर्व स्तरांतून कौतुक
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या या पुरस्कारामुळे ईश्वर बाबा ठाकूर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांचे राजकीय, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील मित्रमंडळी, पोलीस प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि नातेवाईकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या सन्मानप्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. ईश्वर बाबा ठाकूर यांच्या निस्वार्थ सेवेचे हे यथोचित कौतुक आहे.



