मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी मुंबईत आज आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला असून या माध्यमातून पक्षाला या मतदारसंघात एक मातब्बर नेता मिळाला आहे.

पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ हे समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती कालच समोर आली होती. यानंतर त्यांनी आज आपल्या समर्थकांसह मुंबई येथे प्रवेश घेतला. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आजच्या प्रवेश सोहळ्यात दिलीप वाघ यांच्यासह त्यांचे बंधू तथा पीटीसीचे चेअरमन संजय वाघ, वाघ कुटुंबिय आणि त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी पक्षाने या माध्यमातून मास्टर स्ट्रोक खेळल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.


