अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरपासून शहादाकडे जाणारा राज्यमार्ग क्रमांक सहा हा नेहमीच वाहतुकीने गजबजलेला असतो. या मार्गावरून अनेक लांब पल्ल्याच्या बसगाड्या तसेच परिसरातील गावांतील नागरिकांची दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र, मुंदडा नगर २ च्या पुढे श्री. केले सरांच्या घराच्याजवळ असलेल्या धोकादायक वळणावर गेल्या तीन महिन्यांपासून एक मोठा खड्डा पडला आहे.
गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे या खड्ड्याची व्याप्ती आणखी वाढली आहे. या खड्ड्याजवळच रस्ता नव्वद अंशात वळत असल्याने आणि त्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने आज, १८ मे रोजी सकाळी १० वाजता गांधीगिरी करत या खड्ड्यात वृक्षारोपण केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी वाहनचालकांना थांबवून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, ज्यामध्ये त्यांनी तीव्र शब्दांत खड्ड्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
तालुका काँग्रेस कमिटीने सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर यांच्या कार्यकारी अभियंत्यांना वस्तुस्थितीचे निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनात रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता दहा वर्षांसाठी एका ठेकेदाराला देखभालीसाठी देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून त्वरित या खड्ड्याची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. पुढे पावसाळा सुरू झाल्यास खड्ड्याचे स्वरूप आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
या गांधीगिरी आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष मनोज पाटील, संदीप घोरपडे, शरद पितांबर पाटील, गजेंद्र साळुंखे, भागवत गुरुजी, के.व्ही. पाटील, प्रताप नागराज पाटील, दिलीप साहेबराव पाटील, पी. वाय. पाटील, तुषार संधान शिव, भगवान संधान शिव, विठ्ठल पवार, प्रमोद पाटील, राजू भाट, बापूराव पाटील, मोहम्मद तेली, मनोहर पाटील, विलास सिताराम पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


