Home Cities जळगाव जळगावच्या प्रशासकीय सुधारणांना राष्ट्रीय स्तरावर गौरव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून सत्कार

जळगावच्या प्रशासकीय सुधारणांना राष्ट्रीय स्तरावर गौरव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून सत्कार


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने राबविलेल्या १०० दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेत जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांचा मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव तथा महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. राजेशकुमार, प्रधान सचिव, सचिव आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेदरम्यान जिल्ह्यात प्रशासनाच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल झाले, ज्यामुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम झाली आहे. ‘जळगाव संवाद’ या नवीन तक्रार निवारण प्रणालीमुळे नागरिकांचा प्रशासनात थेट सहभाग वाढला आहे. ‘JIVANT’ मोहिमेद्वारे शासकीय याद्यांमधील मृत नावे यशस्वीरित्या हटविण्यात आली आहेत. ‘ई-ऑफिस’ प्रणालीच्या माध्यमातून १६ हजारांहून अधिक फाईल्सची जलदगतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. यासोबतच, डिजिटल गव्हर्नन्सचा स्वीकार करत शेतसुलभ योजना, ई-क्वासी-ज्यूडिशियल प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे प्रशासकीय कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढली आहे.

UDAN योजनेअंतर्गत सुरू झालेल्या हवाई सेवेमुळे जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी सुधारली असून, १ लाखांहून अधिक प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे. सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे शासकीय योजनांची माहिती १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे.

१०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात जळगाव जिल्हा पोलीस दलानेही उत्कृष्ट काम केले आहे. युजर फ्रेंडली वेबसाइट, जलद पारपत्र आणि चारित्र्य पडताळणी सेवा, तक्रार निवारण दिवसांचे आयोजन, QR कोड आधारित ऑनलाइन तक्रार प्रणाली, सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अभ्यागत मदत कक्षांची स्थापना, वर्षानुवर्षे पडून असलेल्या वाहनांची विल्हेवाट आणि मुदतबाह्य अभिलेखांचे निर्लेखन यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकसेवेत सुधारणा झाली आहे. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी ‘Top Cop of the Month’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या या शानदार यशाबद्दल केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound