Home Cities यावल यावल तालुक्याला अवकाळी पावसासह वादळाचा फटका !

यावल तालुक्याला अवकाळी पावसासह वादळाचा फटका !

0
273

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरासह तालुक्यातील विविध गावांना अवकाळी पावसासह वादळाचा फटका बसला असून यात मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे.

यावल तालुक्यात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने आणि बेमोसमी अवकाळी पावसाने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती व घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सतत वाढत असलेल्या तापमानामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना हवामानात अचानक बदल झाला, पण त्याचा फटका अनेक गावांना बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरासह निमगाव, राजोरा, विरावली, दहिगाव, सावखेडा सिम, मोहराळा, हरिपुरा, परसाडे, सातोद, कोळवद, कोरपावली, चितोडा डोंगर, कठोरा, बोरखेडा, हिंगोणा सांगवी, मारूळ या परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरांवरील छप्पर उडून गेले असून रस्त्यावर मोठमोठी झाडे कोसळली आहेत.

यामुळे काही ठिकाणी केळीच्या कापणीला आलेल्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. झाडे कोसळल्याने यावल ते कोरपावली मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मागील तीन तासांपासून या मार्गावरून एसटी बस सेवा व मोठ्या वाहनांची वाहतूक थांबविण्यात आली आहे.

यावल येथील पत्रकार जीवन चौधरी यांच्या घरावरील टीन पत्रे वाऱ्यामुळे हवेत उडून गेली, असे स्थानिक सूत्रांकडून समजते. शहरात सतत तीन तासांपासून पाऊस सुरू असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे व अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असून प्रशासनाकडून मदत व पुनर्वसनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound