Home Cities जळगाव ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’! वादळी वारे आणि पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा

ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’! वादळी वारे आणि पावसाची शक्यता; सतर्कतेचा इशारा


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी आज दुपारी ४.४० वाजता जळगाव जिल्ह्यासाठी तातडीचा “रेड अलर्ट” जारी केला आहे. या गंभीर हवामान अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील काही तासांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यासोबतच, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यातील संभाव्य धोका लक्षात घेता, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी तातडीने सर्व बचावकार्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे कठोर आदेश दिले आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये आणि सुरक्षित ठिकाणीच थांबावे. तसेच, शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मार्गदर्शक सूचना जारी
जिल्हा प्रशासनाने या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आरोग्य सेवा यांना तातडीने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्यासाठी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने वादळी वाऱ्याच्या वेळी नागरिकांनी आणि यंत्रणेने कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:

नागरीकांनी अशी घ्यावी काळजी !
विजेच्या ढगगडगडाटानंतर अजिबात घराबाहेर पडू नये. जर कोणी मोकळ्या मैदानात असेल, तर त्यांनी त्वरित जवळच्या सुरक्षित इमारतीत किंवा सखोल ठिकाणी आश्रय घ्यावा.
घरात असताना घरातील सर्व विद्युत उपकरणे आणि चार्जर बंद ठेवावेत. लोखंडी तंबू, शेड, मनोरे किंवा उंच झाडांच्या खाली चुकूनही आश्रय घेऊ नये. पाण्याच्या जवळ किंवा ओलसर भागात थांबणे पूर्णपणे टाळावे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound