Home Cities बुलढाणा महावितरणच्या मानव संसाधन विभागाची धुरा राजेंद्र पवारांच्या हाती!

महावितरणच्या मानव संसाधन विभागाची धुरा राजेंद्र पवारांच्या हाती!


बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) च्या संचालक (मानव संसाधन) पदाचा कार्यभार राजेंद्र पवार यांनी आज स्वीकारला. त्यांची या महत्त्वाच्या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. यापूर्वी ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून यशस्वीरित्या कार्यरत होते.

महावितरणमधील प्रदीर्घ, ३६ वर्षांच्या सेवेचा अनुभव असलेले नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील भऊर गावचे रहिवासी आहेत. त्यांनी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विद्युत अभियांत्रिकीची पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात वाशी (जि. रायगड) येथे केली. आपल्या कामातील निष्ठा आणि योगदानाच्या बळावर त्यांनी सहायक अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता या पदांवरही यशस्वी काम केले. सन २०११ मध्ये त्यांची थेट भरती प्रक्रियेतून कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल आणि कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी कार्यभार सांभाळला. अधीक्षक अभियंता म्हणून त्यांनी नागपूर आणि पुणे येथेही आपल्या कामाचा ठसा उमटवला. गेल्या सव्वादोन वर्षांपासून ते पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते, जिथे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

‘महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मानव संसाधनाचे एक आश्वासक व्यवस्थापन सदैव उपलब्ध राहील. कंपनी व कर्मचारी हिताला प्राधान्य देत अंतर्गत प्रशासकीय कामकाज आणखी गतिमान करण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यावर भर राहणार आहे. – राजेंद्र पवार, संचालक (मानव संसाधन)


Protected Content

Play sound