Home Cities जळगाव भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘मिशन संजीवनी’ उपक्रम! ७५ गावांमध्ये २९६ ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग!

भूजल पातळी वाढवण्यासाठी ‘मिशन संजीवनी’ उपक्रम! ७५ गावांमध्ये २९६ ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग!


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील दिवसेंदिवस घटत चाललेली भूजल पातळी आणि त्यामुळे निर्माण होणारी पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती यावर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने ‘मिशन संजीवनी’ या एका महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील तब्बल ७५ गावांमधील विविध ठिकाणी २९६ वॉटर हार्वेस्टिंगच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

वाढते तापमान, पर्यावरणातील बदल आणि वाढते शहरीकरण यामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही घट चिंतेचा विषय बनली असून, यामुळे भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. यावर मात करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून ‘मिशन संजीवनी’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन इमारत बांधकामांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याशिवाय संबंधित बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला आणि कंत्राटदाराचे देयक अदा केले जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

‘मिशन संजीवनी’ अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील ७५ गावांमधील २९६ कामांना मान्यता मिळाली आहे आणि या सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रणाली स्थापित केली जाणार आहे. पावसाचे पाणी वाया न जाऊ देता ते थेट जमिनीत मुरवण्याचा एवढ्या मोठ्या स्तरावरील प्रयोग जळगाव जिल्ह्यात प्रथमच होत आहे. यामुळे निश्चितच जिल्ह्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर आणि यावल या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये सुरू असलेल्या विविध इमारत बांधकामांच्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाईच्या संकटावर मात करता येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.


Protected Content

Play sound