Home Cities जळगाव गरजू विद्यार्थींनीला मदतीचा हात; सामाजिक संघटना सरसावल्या

गरजू विद्यार्थींनीला मदतीचा हात; सामाजिक संघटना सरसावल्या


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील फोटोग्राफर प्रकाश लिंगायत यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावाच्या उपचारासाठी त्यांनी आपले कॅमेरे विकले, पण त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत. त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, स्वतःच्या आजारपणावर उपचार करणेही त्यांना कठीण झाले आहे. त्यांची मुलगी मानसी एका खासगी शाळेत शिकत असून, गेल्या दोन वर्षांपासून तिची शाळेची आणि खासगी शिकवणीची फी थकीत आहे.

या कठीण परिस्थितीत प्रकाश लिंगायत यांनी सामाजिक कार्यकर्त्या वासंती चौधरी यांच्याकडे मदतीची याचना केली. वासंती चौधरी यांनी तातडीने पंकज जैन यांच्याशी संपर्क साधून त्यांना परिस्थितीची माहिती दिली आणि मदतीची विनंती केली. पंकज जैन यांनीही सामाजिक बांधिलकी जपत डायमंड ग्रुप, सकल जैन सोशल ग्रुप आणि जळगाव जैन धार्मिक व सोशल मीडिया या ग्रुप्समध्ये मदतीसाठी संदेश पाठवला.

जैन यांच्या आवाहनाला सामाजिक कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अवघ्या दोन तासांत ७० हजार रुपयांची मदत जमा झाली. ही मदत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या हस्ते प्रकाश लिंगायत यांची मुलगी मानसी हिला धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली. एका बाजूला दुःखाचा डोंगर असला तरी, सामाजिक संघटनांच्या या मदतीने प्रकाश लिंगायत यांना मोठा आधार मिळाला आहे. या संवेदनशील कृतीमुळे समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे, हे दिसून आले.


Protected Content

Play sound