Home क्राईम गिरणा नदीच्या काठी अज्ञात पुरुषाचा सांगाडा आढळल्याने खळबळ

गिरणा नदीच्या काठी अज्ञात पुरुषाचा सांगाडा आढळल्याने खळबळ

0
189

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आमोदा बुद्रुक गावाजवळ गिरणा नदीच्या काठी एका अज्ञात व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे ६० ते ६५ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा सांगाडा असून त्याचा एक हात, एक पाय आणि छातीचा काही भाग गायब आहे. १९ एप्रिल रोजी रात्री आमोदा गावाकडून येणाऱ्या जुन्या रस्त्यावर हा सांगाडा काही नागरिकांना दिसला, त्यानंतर त्यांनी तातडीने तालुका पोलिसांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण आगोणे यांच्यासह मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून आवश्यक नमुने घेतले असून, अधिक तपासणीसाठी सांगाडा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगाड्याचा काही भाग गायब असून तो प्राण्यांनी नेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, या व्यक्तीची ओळख पटवणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Protected Content

Play sound