जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत एका घरात अनधिकृतपणे प्रवेश करून टेहाळणी करणाऱ्या आणि पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रौढाला धक्काबुक्की करून पसार झालेल्या आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी १५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली असून, रात्री ९ वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनी परिसरात राहणारे मनोज प्रकाश वाघ (वय ४०, रा. महानज नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्या घरात मंगळवारी दुपारी ३ वाजता ईश्वर सोनवणे (पूर्ण नाव माहित नाही, रा. जळगाव) नामक संशयित व्यक्ती घुसून टेहाळणी करत होता. हा प्रकार मनोज वाघ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ईश्वर सोनवणे याने मनोज वाघ यांना धक्का मारला आणि तेथून पळ काढला.

या घटनेनंतर मनोज वाघ यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपी ईश्वर सोनवणे यांच्या विरोधात अनधिकृत प्रवेश आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी ईश्वर सोनवणे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करत आहेत.


