Home राजकीय रस्ते अपघात रोखण्यासाठी गडकरींचा ‘मास्टर प्लान’ !

रस्ते अपघात रोखण्यासाठी गडकरींचा ‘मास्टर प्लान’ !


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशभरात वाढत चाललेल्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण ‘मास्टर प्लान’ जाहीर केला आहे.

एका खासगी टीव्ही कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी रस्ते सुरक्षा, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सरकारच्या पुढील योजना स्पष्ट केल्या.
नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की, आता कोणताही नवा टू-व्हीलर खरेदी करणाऱ्याला वाहन कंपनीने दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे अनिवार्य राहील. “गाडीवर बसणाऱ्या दोघांनीही हेल्मेट घालणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अपघातात मृत्यूचं प्रमाण नक्कीच कमी होईल,” असे ते म्हणाले.

गडकरींनी ‘राहवीर योजना’ जाहीर करत सांगितले की, अपघातग्रस्ताला वेळेत रुग्णालयात दाखल करणाऱ्याला सरकारकडून २५,००० रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. यासोबतच, अपघातग्रस्त रुग्णाचा सात दिवसांपर्यंतचा उपचार खर्च, जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत, सरकारकडून दिला जाईल. जर आपण सर्व नागरिक या मोहिमेत सहभागी झालो, तर दरवर्षी किमान ५०,००० लोकांचे प्राण वाचवता येतील,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

गडकरी म्हणाले, “आता रस्त्यांचे बांधकाम पूर्णपणे प्रीकास्ट तंत्रज्ञानाने होईल. म्हणजेच, रस्त्यांचे भाग कारखान्यात तयार होतील आणि नंतर प्रत्यक्ष ठिकाणी बसवले जातील.” यामुळे वेळ, खर्च आणि प्रदूषण – तिन्ही गोष्टींवर नियंत्रण मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

रस्त्यांमध्ये असलेल्या बॅरियरवरून उड्या मारून होणाऱ्या अपघातांवर उपाय म्हणून या बॅरियर्सची उंची ३ फूट करण्यात येणार आहे. याच्या दोन्ही बाजूंना एक मीटर रुंदीची मातीची पट्टी बनवून त्यावर झाडं लावली जातील, जेणेकरून लोक हे बॅरियर्स पार करू शकणार नाहीत.

देशभरात दरवर्षी अंदाजे १.८० लाख लोकांचा मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होतो, हे मोठं आव्हान असल्याचं गडकरी म्हणाले. “फक्त शाळांसमोर दरवर्षी १० हजार मुलं अपघातांमध्ये जीव गमावतात,” असे सांगत त्यांनी सांगितले की, सरकार सध्या ‘रोड सेफ्टी ऑडिट’ करत असून, ब्लॅक स्पॉट्स (अधीक अपघात घडणारी ठिकाणं) ओळखून त्यावर कार्यवाही केली जात आहे.

गडकरी यांनी सांगितले की, मलेशियामधून आणलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे मेट्रो प्रकल्पांमध्ये हजारो कोटींची बचत झाली आहे. चेन्नई मेट्रो प्रकल्पात ७०-७५ हजार कोटींचा खर्च कमी करता आला असून, दोन पिलरमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटर करण्यात आले. यामुळे तीन पिलर वाचले, तर बीम आता स्टीलऐवजी स्टील फायबरने तयार होणार आहे.

गडकरी यांचा ‘मास्टर प्लान’ केवळ योजनांच्या घोषणांपुरता मर्यादित नसून, त्यात प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक आणि सामाजिक बाबींचा समावेश आहे. लोकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेने देशात रस्ता सुरक्षेचे नवे युग सुरू होणार, यात शंका नाही.


Protected Content

Play sound