यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाडळसे गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात, सामाजिक ऐक्य आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
१३ एप्रिलच्या मध्यरात्री, म्हणजेच १४ एप्रिलला दुपारी १२ वाजता, पाडळसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांच्या आतषबाजीसह जयंती उत्सवाची सुरुवात झाली. या वेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बसस्थानक परिसर, माता रमाई चौक, आंबेडकर चौक आणि नाग भूमी बुद्ध विहार परिसरात आकर्षक लाईटिंग, निळे झेंडे आणि पताका लावून गाव संपूर्णपणे सजवण्यात आले होते. यामुळे वातावरणात आनंद आणि गौरवाची भावना अधिकच वाढली.
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. गुणवंती पाटील, शिवाजी महाराज चौकात पोलीस पाटील सुरेश खैरनार, तर आद्यकवी महर्षी वाल्मिकी नगर येथील टोकरे कोळी आदिवासी समाज सभागृहात उपसरपंच अलका सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.तसेच, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश तायडे आणि नाग भूमी बुद्ध विहार येथे मुकेश अडकमोल व सुनील तायडे यांच्या उपस्थितीत पूजन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी सी. एच. वाघमारे, माजी सरपंच खेमचंद कोळी, तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाडळसे गावात सामाजिक सलोखा, समता व बंधुभावाची भावना दृढ झाली. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत गावकऱ्यांनी संविधानिक मूल्यांचे स्मरण केले आणि एकात्मतेचा आदर्श घालून दिला. संपूर्ण गावाने एकत्र येऊन ही जयंती प्रेरणादायी पद्धतीने साजरी केली.
पाडळसे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
6 days ago
No Comments