Home राजकीय विरोधकांच्या अपप्रचाराला लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत : आदिती तटकरे

विरोधकांच्या अपप्रचाराला लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत : आदिती तटकरे

0
272


मुंबई-वृत्तसेवा | आठ लाख महिलांना लाडकी बहिण योजनेत केवळ पाचशे रूपये मिळणार असल्याने विरोधक आक्रमक झालेले असतांनाच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सन्मान निधीबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ठामपणे उत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. काही महिलांना केवळ ५०० रुपये मिळाल्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असताना, ‘एक्स’वरील पोस्टद्वारे तटकरे यांनी सविस्तर खुलासा केला आहे.

“दिनांक २८ जून २०२४ व ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, ज्या महिलांनी इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नाही, अशा पात्र लाभार्थिनींना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी दिला जात आहे. तसेच, ज्या महिलांना इतर योजनांतून १५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळते, त्यांना उर्वरित फरकाचे पैसे योजनेअंतर्गत दिले जात आहेत,” असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

विशेषतः, नमो शेतकरी सन्मान योजनेचा १००० रुपये दरमहा लाभ घेणाऱ्या ७७,४१४८ महिलांना उर्वरित ५०० रुपयांचा फरक सन्मान निधी म्हणून वितरित केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

“एकाही पात्र भगिनीला योजनेतून वगळण्यात आलेले नाही. दिनांक ३ जुलै २०२४ नंतर या योजनेच्या अंमलबजावणीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मी स्वतः अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे स्पष्ट केले असून, त्याची विधिमंडळाच्या कामकाजात नोंद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

विरोधकांकडून सातत्याने सुरू असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाल्या, “विरोधकांचे प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. अशा अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत, याची मला खात्री आहे.”


Protected Content

Play sound