
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आणि थोर समाजसुधारक परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती बोराळे ग्रामपंचायततर्फे अत्यंत उत्साहात व सन्मानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच संध्या राजपूत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली. या वेळी सरपंच सौ. संध्या राजपूत म्हणाल्या, “डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून, ते सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. त्यांची विचारधारा आजही आपल्याला दिशा देणारी आहे.”


कार्यक्रमास उपसरपंच दिपाली खिलचंद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य गौतमाबाई वानखेडे, मायाबाई राजपूत, भारती नितीन सिंग राजपूत, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उज्जैनसिंग राजपूत, पोलीस पाटील माधुरी राजपूत, अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे, मदतनीस सुवर्णा राजपूत, आशा वर्कर सुनेना राजपूत, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुपडू संदानशिव, कमलबाई तायडे, संदीप वानखेडे, हंसराज राजपूत, नितीन राजपूत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक सलोखा, समता आणि शिक्षणाचे महत्व यावर भर देणारे प्रेरणादायी विचार यावेळी मांडण्यात आले. संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय परिसर देशभक्तीपर आणि संविधानवादी घोषणांनी निनादला होता. उपस्थितांनी ‘जय भीम’च्या जयघोषात महामानवाला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.


