Home क्राईम अजिंठा चौकात भरधाव डंपरची दुचाकीला धडक! महिला गंभीर जखमी, चालक ताब्यात

अजिंठा चौकात भरधाव डंपरची दुचाकीला धडक! महिला गंभीर जखमी, चालक ताब्यात


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहमी गजबजलेल्या अजिंठा चौकात आज, सोमवार १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता एका भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीटी ५२३६) वरून एक महिला अजिंठा चौकातून जात असताना, एका भरधाव वेगाने आलेल्या विना क्रमांकाच्या डंपरने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने डंपर चालकाला पकडण्यात आले. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, या डंपरला कोणताही नंबर प्लेट नव्हती. तसेच, डंपर चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना (लायसन्स) देखील नव्हता. अपघातामुळे महिलेच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालक आणि त्याचे विना क्रमांकाचे वाहन जप्त केले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भर चौकात आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Protected Content

Play sound