Home Cities जळगाव कचरावेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कचरावेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर


जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुधर्मा सामाजिक संस्थेने महिला दिनानिमित्त तांबापुरा आणि मेहरून येथील 23 कचरावेचक महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या उपक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली, तसेच पौष्टिक आहार म्हणून खजूर आणि मिठाईचे वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम भाऊंचे उद्यान येथे महिला दिनाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता पार पडला. जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, मनशक्ती केंद्राचे अभय खांदे आणि वरद हॉस्पिटलच्या डॉक्टर भावना चौधरी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. डॉ. भावना चौधरी यांनी सर्व महिलांची तपासणी करून त्यांना योग्य औषधे दिली, सुनील भंगाळे यांनी उपलब्ध करून दिली. अभय खांदे यांनी महिलांना पोषण आहार दिला.

या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्नी ऐश्वर्या रेड्डी आणि तहसीलदार शीतल राजपूत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सुधर्मा संस्थेच्या वतीने सुनीता बेलसरे यांनी त्यांचे स्वागत केले. उपस्थित महिलांपैकी दोन महिलांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. लिलाबाई वेरूळकर आणि आशाबाई बोरसे यांनी सुधर्मा संस्था त्यांच्यासाठी चांगले काम करत आहे, असे सांगितले. सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल बोलताना, गरीब वंचितांसाठी काम करताना प्रत्यक्ष ईश्वराची पूजा केल्यासारखा आनंद मिळतो, असे सांगितले.

ऐश्वर्या रेड्डी यांनी सुधर्माच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आणि महिलांशी हिंदीमध्ये संवाद साधला. तहसीलदार शीतल राजपूत यांनी जळगावात अनेक मोठे कार्यक्रम होत असले, तरी सुधर्माच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी माहिती मिळाल्यानंतरच घेतला, असे सांगितले. त्यांनी महिलांना त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण देण्याचे महत्त्व पटवून सांगितले आणि शासकीय योजनांचा लाभ मिळत नसेल, तर त्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. औषधे मिळाल्यानंतर महिलांना खूप आनंद झाला. या कार्यक्रमासाठी सुधर्मा संस्थेचे सदस्य नितीन तायडे, प्रियंका पवार, नानाभाऊ चव्हाण, राहुल ठाकूर आणि सूर्यकांत हिवरकर यांनी मदत केली.


Protected Content

Play sound