अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पावसाळा सुरू होण्यापूर्वी पाडळसरे धरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे आणि शासनाचा प्राप्त निधी पूर्णपणे खर्च करावा, असे आवाहन पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने केले आहे. निम्न तापी प्रकल्पाशी संबंधित उपअभियंता आणि अधिकाऱ्यांनी पाडळसरे धरणाच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी समितीने हे आवाहन केले.
पाडळसरे धरणासाठी प्राप्त निधी पूर्णपणे धरणाच्या कामावरच खर्च झाला पाहिजे, यासाठी समिती आग्रही आहे. तसेच, या धरणासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा आणि अवर्षणग्रस्त पट्ट्यात असलेल्या या धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत तातडीने समावेश व्हावा, यासाठी समिती आंदोलनाच्या तयारीत आहे, असे समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे, महेश पाटील, रवींद्र पाटील, सुनील पाटील, अजयसिंग पाटील आणि डॉ. संजय पवार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी निम्न तापी प्रकल्पाचे उपअभियंता हितेश भटूरकर यांनी प्रकल्पातील पुनर्वसन, धरणाचे बांधकाम, उपसा सिंचन योजना आणि मातीकाम या कामांच्या तांत्रिक बाबींची माहिती दिली. जुलै अखेरपर्यंत प्राप्त निधी खर्च करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. धरणाच्या कामावर निधीच्या वितरणाबाबतच्या नियोजनाची माहितीही त्यांनी समितीच्या सदस्यांना दिली.
यावेळी प्रशांत भदाणे, सौ. वसुंधरा लांडगे, एम.डी. पाटील, रामराव पवार, भरतसिंग परदेशी, डी.के. पाटील, सुशील भोईटे, प्रसाद चौधरी आणि दशरथ लांडगे आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधकामस्थळी जाऊन सुरू असलेल्या कामाची आणि भविष्यातील कामाच्या नियोजनाची माहिती दिली.


