अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “बाजार समिती ही केवळ व्यवहारांसाठी नसून, शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरज आहे,” असे मत माजी मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आयोजित शेतकरी सभासद सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
बाजार समिती नफ्यात आली असून, आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी पुढील टप्प्यात शेतकऱ्यांसाठी अधिक सुविधा निर्माण केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सभापती अशोक पाटील यांनी बाजार समितीला कर्जमुक्त करून कोट्यवधींच्या शिलकीपर्यंत आणण्याची यशस्वी वाटचाल कशी झाली, याबाबत माहिती दिली.

यावेळी उत्कृष्ट शेतकरी, आडतदार, हमाल, व्यापारी आणि गुमास्ता यांना सन्मानित करण्यात आले. तसेच गाव विकास कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना ‘आदर्श ग्रामपंचायत’ पुरस्कार, पतसंस्थांना ‘आदर्श विकास सोसायटी’ पुरस्कार देण्यात आला. एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या रोहित आणि शुभांगी कंखरे भावंडांना ‘यशोदीप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवजयंती निमित्त आयोजित शिवव्याख्यानात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी “शिवराय हे जाती-धर्मापलिकडे जाऊन रयतेचा विचार करणारे खरे लोकनेते होते” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमादरम्यान बाजार समितीच्या नव्या व्यापारी गाळ्यांचे भूमिपूजन, गुमास्ता कट्ट्याचे लोकार्पण आणि ‘शेतकरी प्रेरणा स्मारक’ उद्घाटनही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. उन्मेष राठोड, उपसचिव अशोक वाघ, लेखापाल योगेश महाजन आदींनी विशेष परिश्रम घेतले.


