यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल-चोपडा रोडवर आज सकाळी भीषण अपघातात एका ३० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.


महाजन पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या या अपघातात वॅगनार कार आणि मोटरसायकलची जोरदार धडक झाली. साकळी गावातील करण विजू जंजाळे (वय ३०) हा आपल्या मामाच्या अंत्यविधीसाठी यावल येथील महाजन पेट्रोल पंपाजवळ डिझेल भरून आपल्या मोटरसायकलवर निघाला होता. दरम्यान, यावलहून साकळी गावाकडे जाणाऱ्या वॅगनार (क्र. MH-19-AP-3273) या चारचाकी वाहनाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटून ती थेट करणच्या मोटरसायकलवर आदळली.
या भीषण धडकेत करण जंजाळे याचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की, परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत करणचा मृत्यू झाला होता. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. अपघातग्रस्त वाहनाला जप्त करण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे. मामाचा अंत्यविधी होत नाही तोच भाच्याचा देखील मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


