भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वडजी गावाच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूकीच प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, यामुळे पाणीपुरवठा योजना आणि शेती धोक्यात आली आहे. वारंवार निवेदने दिल्यानंतरही वाळू वाहतूक थांबवण्यात अपयश आल्याने स्थानिकांनी प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पत्रकारांसह परिसरातील ग्रामस्थांनी भडगाव तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. विशेषतः पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ वाळू उपशा होतो आहे, ज्यामुळे भविष्यात गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवू शकते. वडजीसह रोकडा फार्म, पळासेडे-रुपनगर, वडगाव-नालबंदी, आणि महीदंळे या गावांच्या पाणीपुरवठा योजना गिरणा नदीवर अवलंबून आहेत. वाळू उपशामुळे या योजना धोक्यात आल्या असून, शेतीचे भवितव्यही अंधारात आहे.
ग्रामपंचायतीने वाळू उपशा रोखण्यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, ठोस कारवाईअभावी वाळू उपशाचे प्रमाण वाढतच आहे. यामुळे वडजीतील पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, आणि ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी यांनी तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देत प्रजासत्ताक दिनापासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
तहसीलदारांची तातडीची दखल
तहसीलदार शितल सोलाट यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत वडजी गावाला भेट दिली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनिषा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत वाळू उपशावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन आणि ग्रामपंचायतीला कडक पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदारांनी वाळूचोरी करणाऱ्यांना कडक इशारा दिला आणि गावकऱ्यांनीही वाळू माफियांना सहकार्य न करण्याचे आवाहन केले. त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले की वाळूचोरी थांबवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना केल्या जातील. ग्रामस्थांनी या बैठकीत वाळू उपशामुळे उद्भवणाऱ्या समस्या मांडल्या. वाळूचोरीमुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय, शेतीसाठी पाण्याची टंचाई आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामस्थांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य ती पावले न उचलल्यास पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, आणि दिनेश परदेशी हे 26 जानेवारीपासून गिरणा नदी पात्रात उपोषणाला बसणार आहेत.