Home पर्यावरण भडगाव कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम: झाडांच्या छायेत शेतकऱ्यांसाठी वाचनालयाची सुविधा !

भडगाव कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम: झाडांच्या छायेत शेतकऱ्यांसाठी वाचनालयाची सुविधा !

0
117


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ताटकळत उभे न राहता, त्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा आणि त्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने भडगाव तालुका कृषी कार्यालयात एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे. सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांच्या संकल्पनेतून आणि तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय परिसरात एक नैसर्गिक वाचन व अभ्यागत कक्ष उभारण्यात आला आहे.

वृक्षारोपणातून साकारला ‘नॅचरल हॉल’ :
काही काळापूर्वी सुखदेव गिरी यांनी कार्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड केली होती. या झाडांची मनापासून जोपासना केल्यामुळे आज त्यांचे रूपांतर मोठ्या वृक्षांत झाले असून, तिथे एक सुंदर नैसर्गिक हिरवागार ‘हॉल’ तयार झाला आहे. याच झाडांच्या थंडगार सावलीत सिमेंटचे बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली असून, शेतकऱ्यांना बसण्यासाठी एक हवेशीर जागा उपलब्ध झाली आहे.

कृषी साहित्याची मेजवानी :
या नैसर्गिक कक्षात शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी मासिक’, कृषी विषयक पुस्तके, दैनंदिन वृत्तपत्रे आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक व बॅनर लावण्यात आले आहेत. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचायला मिळत असल्याने, कार्यालयात येणारा शेतकरी आता समृद्ध होऊन बाहेर पडत आहे.

सुखदेव गिरी यांची भावना :
या उपक्रमाबाबत बोलताना सुखदेव गिरी म्हणाले की, “शेतकरी हा कृषी विभागाचा आत्मा आहे. कार्यालय लहान असल्याने शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत होती. ही अडचण दूर करण्यासाठी आणि त्यांना ज्ञानाची जोड देण्यासाठी या नैसर्गिक कक्षाची निर्मिती केली. आज झाडांच्या सावलीत शेतकरी आनंदाने माहिती वाचताना पाहून मनाला मोठे समाधान मिळते.” भडगाव कृषी कार्यालयाचा हा उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठी एक उत्तम वस्तुपाठ ठरला असून, परिसरातील शेतकऱ्यांकडून या ‘ज्ञानाच्या सावली’चे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound