जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एखाद्या व्यक्तीला जन्मजात व्यंग असणं आणि ते व्यंग वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने सेवाभावी पद्धतीने दूर करण्यासाठी प्रयत्न करणे ही खूप मोठी रुग्णसेवा आहे. त्यासाठी वैद्यकीय पथकाने कायम कार्यरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन अमेरिका येथील प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी विंस्टेन यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ३ दिवसीय दुभंगलेले ओठ व चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी याविषयी मोफत शस्त्रक्रिया शिबिर दि. १४ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनावेळी अमेरिका येथील सर्जन डॉ. लॅरी विन्सटेन बोलत होते. महाविद्यालयातील कान नाक घसा, शल्य चिकित्सा आणि बधिरिकरण शास्त्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने हे शिबिर पार पडत आहे.
उद्घाटनावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अशोक जैन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सदस्य डॉ. अशोक श्रीश्रीमाळ, जिल्हाध्यक्ष अजय राखेचा, सचिव अजय लोढा, विश्वस्त प्रमोद साबद्रा मंचावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन करून मान्यवरांनी शिबिराचे उद्घाटन केले. यानंतर डॉ. गिरीश ठाकुर आणि डॉ. लॅरी विन्स्टेन यांनी आपल्या मनोगत आतून शिबिराविषयी आढावा घेत गरजूंसाठी अशा शिबिराची गरज असल्याचे सांगितले.
यानंतर ओपीडीत दुभंगलेले ओठ, कापले गेलेले कान-नाक, चेहऱ्याचे व्यंग असलेल्या लहान बालकांचे, तरुण, जेष्ठ नागरिकांची तपासणी डॉ. विन्स्टेन यांनी केली. त्यातून आज मंगळवारी ७ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच, आज दि. १५ व १६ जानेवारी रोजी उर्वरित रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, कान नाक घसा विभागाचे विभागप्रमुख डॉ. अक्षय सरोदे, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अमित हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील डॉक्टर, कनिष्ठ निवासी, इंटर्न, कर्मचारी यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी सहकार्य केले.