प्रयागराज – विश्वातील सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महोत्सव म्हणून ख्यात असणाऱ्या “महाकुंभ 2025” चा प्रारंभ आज पौष पौर्णिमेच्या पवित्र दिवशी झाला. आज पहाटेपासूनच असंख्य भाविकांची त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे.
महाकुंभाचा पौराणिक महिमा
महाकुंभाच्या आयोजनाचे उल्लेख पुराणांमध्ये आढळतात. समुद्रमंथनादरम्यान अमृतकलशासाठी देव आणि दानवांमध्ये झालेल्या संघर्षात अमृताच्या काही थेंब पृथ्वीवरील चार ठिकाणी पडले. हे ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक. या पवित्र ठिकाणी दर 12 वर्षांनी महाकुंभ मेळा आयोजित केला जातो. कुंभमेळ्याचा उल्लेख विष्णू पुराण, कूर्म पुराण, स्कंद पुराण, भागवत पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणात आढळतो. सुमारे 2500 वर्षांपूर्वी या आयोजनाचा पहिला ऐतिहासिक उल्लेख मिळतो.
शाही स्नानाची भव्य परंपरा
महाकुंभातील “शाही स्नान” हा महत्त्वाचा सोहळा आहे. या दिवशी सर्वप्रथम साधू-संत, तपस्वी आणि विशेषतः नागा साधू रथ, हत्ती आणि घोड्यावर स्वार होऊन भव्य मिरवणूक काढतात. या मिरवणुकीला पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात. शाही स्नानाच्या परंपरेचा उगम प्राचीन काळात राजे आणि साधू-संतांच्या संयुक्त स्नानात झाला आहे, ज्यामुळे या सोहळ्याला शाही स्वरूप प्राप्त झाले आहे.
शाही स्नानाच्या प्रमुख तारखा
महाकुंभ 2025 मध्ये एकूण सहा शाही स्नान होणार आहेत. या प्रमुख तारखा पुढीलप्रमाणे आहेत:
पहिलं शाही स्नान: पौष पौर्णिमा – 13 जानेवारी 2025
दुसरं शाही स्नान: मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025
तिसरं शाही स्नान: मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025
चौथं शाही स्नान: वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025
पाचवं शाही स्नान: माघी पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025
सहावं शाही स्नान: महाशिवरात्रि – 26 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचा संदेश
महाकुंभ 2025 च्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स ( ट्विटर) वर पोस्ट करत या भव्य सोहळ्याचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “महाकुंभ 2025 हा भारताच्या आध्यात्मिक वारशाचा प्रतीक आहे. हा दिवस श्रद्धा, भक्ति आणि संस्कृतीच्या संगमाचा उत्सव आहे.” यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व श्रद्धाळूंना, संतांना आणि आगंतुकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. विविधतेत एकता जपणाऱ्या या पर्वामुळे भारतीय संस्कृतीचा वैश्विक गौरव वाढतो.”
महाकुंभाचे उत्कृष्ट नियोजन
महाकुंभाच्या आयोजनासाठी स्वच्छता, सुरक्षा, आरोग्यसेवा, वाहतूक आणि निवास व्यवस्थांवर विशेष भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, महाकुंभ हा दिव्य आणि भव्य अनुभव देणारा सोहळा आहे. शहरात आधुनिक सुविधांसह लाखो भाविकांच्या स्वागतासाठी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.