एरंडोल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोल शहरातील महामार्गावर एका भरधाव टँकरने दुचाकी ला दिलेल्या धडकेत दोन तरुण ठार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजता घडली आहे. हे घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू भिला भोई (४६, रा. एरंडोल) आणि दीपक रामकृष्ण मोरे (वय ३४, रा. शिरसोली ता. जळगाव) अशी मृतांची नावे असून ते साडूभाऊ होते.
राजू भोई यांच्या पुतणीला रविवारी हळद लागली. सोमवारी तिचा विवाह होणार आहे. दरम्यान, रविवारी २२ डिसेंबर रोजी रात्री राजू भोई व दीपक मोरे घराकडे जात असताना महामार्गावर हा अपघात झाला. टँकरने (एमएच १९ बीपी २००३) धडक दिल्यावर राजू भोई हे जागीच ठार झाले तर दीपक हे जखमी झाल्यानंतर त्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान घटना घडल्यानंतर एरंडोलकरांनी एकच संताप व्यक्त करत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.