मनोज जरांगे पुन्हा ‘या’ तारखेपासून उपोषणला बसणार

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी येत्या २५ जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे नव्या सरकारचे टेन्शन पुन्हा वाढणार आहे. आज आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत उपोषणाच्या तारखेची घोषणा केली. २५ जानेवारीच्या आत सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. नाही तर २५ जानेवारी २०२५ ला पुन्हा एकदा स्थगित केलेले आमरण उपोषण सुरू करणार. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा करताना सांगितले की, सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. सरकारला हात जोडून विनंती आहे की आमच्या मागण्या तातडीने मान्य करा. राज्य सरकारने बॉम्बे, सातारासह हैदराबाद गॅझेट लागू करावे. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. सरकारने मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम बंद केले आहे ते सुरू करावे. सरकारने मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले आहे ते आरक्षण लागू करावे. आमच्या मागण्यांचे निवेदन पुन्हा एकदा जालना जिल्हाधिका-यांच्या मार्फत आम्ही सरकारला देणार आहोत. आमच्या मागण्या सरकारने तात्काळ मंजूर कराव्यात.

२५ जानेवारीला महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाने अंतरवाली सराटीत यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची घोषणा करताना मराठा बांधवांना आवाहन केले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता सामूहिक उपोषण करणार आहोत. कोणावरही उपोषण करावं असे बंधन नसणार आहे. इथे येऊन फक्त बसले तरीही चालते. ज्यांची इच्छा आहे ते उपोषणाला अंतरवाली सराटीत बसू शकतात. मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना वाहने घेऊन आंतरवालीत यावे असे सांगितले आहे.

२६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे. मराठा समाजाने वाहनासह २५ जानेवारीला आंतरवाली सराटीत यावे. हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे. सगळ्यांनी अंतरवाली सराटीत यायचं आहे. माझे गाव माझी जबाबदारी म्हणून आपणच आपल्या गावात बैठका घेऊन नेटवर्क उभे करायचे आहे. मराठा समाजाने पत्रिका छापून प्रत्येकाच्या घराघरात पत्रिका पोहोचवायची आहे., असे ते म्हणाले. तसेच, २ जानेवारीच्या आत सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. २५ जानेवारीला कोणीही लग्नाची तारीख धरू नका. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट या राज्यात उसळणार आहे. आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा. २५ जानेवारीपर्यंत तुम्हाला वेळ आहे. त्यानंतर आम्ही एकूण घेणार नाही. मी मराठा समाजाच्या अपेक्षा भंग होऊ देणार नाही.

Protected Content