नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक आता १९ डिसेंबरला होणार आहे. यासाठी १८ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. मागील 2 वर्षांपासून विधानपरिषदेचं सभापती पद रिक्त आहे. नीलम गोर्हे या उपसभापती आहेत. त्याच सध्या विधानपरिषदेचं काम पाहत आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्ष पद भाजपा कडे असल्याने आता विधानपरिषद शिवसेना आपल्याकडे ठेवत गोर्हेंना प्रमोशन देणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
वास्तविक रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत ऑगस्ट २०२२ मध्ये संपल्यापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. मात्र, आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने ते भरले जाईल, असे सांगितले जात होते. या विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस असणार आहे. हे अपेक्षितच आहे. वास्तविक या पदावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे भाजपकडे आहे. तर विधान परिषदेचे उपसभातीपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या पदावर राष्ट्रवादीचाच सदस्य निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.