खामगाव-अमोल सराफ | प्रदीर्घ काळानंतर आकाशदादा फुंडकर यांच्या रूपाने खामगावकरांना लाल दिवा मिळाला आहे. आता त्यांच्या माध्यमात्ूान खामगावसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात विकासाचे एक नवीन पर्व सुरू व्हावे अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.
काल पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या शपथविधीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून आकाश भाऊसाहेब फुंडकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. राज्य निर्मितीनंतरचा इतिहास पाहता मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या रूपाने युवा चेहरा असलेले सहावे कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. ”मी आकाश पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शपथ घेतो की”…. अशा धीरगंभीर शब्दांमध्ये त्यांनी शपथ घेतली तेव्हा संपूर्ण खामगाव शहरात जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचा राजकीय व सामाजिक वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या आकाशदादांच्या कार्याचे या मंत्रीपदाच्या माध्यमातून पक्षाने खरे मूल्यमापन केल्याची भावना खामगावसह परिसरातून व्यक्त होत आहे.
आकाशदादा हे संघाच्या संस्कारांमध्ये वाढलेले एक सात्वीक नेतृत्व आहे. सदैव जनतेच्या हितासाठी कार्यरत असलेल्या आकाशदादांना कधी कुणी तणावात वा नैराश्यात पाहिलेले नाही. खामगाव मतदारसंघात्तून लागोपाठ तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवल्यानंतर त्यांच्या समर्थकांना मंत्रीपदाची आस लागली होती. स्वत: आकाशदादा व त्यांचे कुटुंब मात्र आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यस्त होते. त्यांनी कधी लॉबींग देखील केली नाही.
आकाशदादांचे वडील भाऊसाहेब पुंडलीकराव फुंडकर यांनी 1980 साली भाजपच्या तिकिटावर विजय संपादन केला होता. यानंतर 2014, 2019 आणि आता 2024 अशी विजयाची हॅटट्रीक त्यांचे चिरंजीव आकाशदादा यांनी केली आहे. ते उच्चशिक्षित असून एक कार्यकुशल लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकीक आहे. तसेच आकाशदादा हे बुलढाणा जिल्ह्यातील अकरावे तर कॅबिनेट मंत्री म्हणून सहावे मान्यवर ठरले आहेत.
आकाशदादांच्या आजवरच्या वाटचालीत त्यांना पिताश्री भाऊसाहेब फुंडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तथापि, त्यांच्या लोकप्रतिनिधीपदाच्या वाटचालीत त्यांचे ज्येष्ठ बंधू सागरदादा फुंडकर यांचे मार्गदर्शन हे मोलाचे असे ठरले आहे. आता फुंडकर बंधूंच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी अशी अपेक्षा जनता व्यक्त करत असून नक्कीच त्यांची कामगिरी उज्वल राहील असा ठाम विश्वास देखील आहे.
भारतीय जनता पक्षाने आकाशदादा फुंडकर यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सुपुर्द केल असून याचा खामगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासात नक्कीच लाभ होणार असल्याचे सर्वांना वाटत आहे. तर त्यांना चांगले खाते मिळण्याची अपेक्षा देखील आता व्यक्त करण्यात येत आहे.