जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी| सुमारे २० ते २५ दिवसामध्ये एकाच शाळेतील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत ओम चव्हाण याच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच या घटनांची सखोल चौकशी करुन न्याय मिळावा अशी मागणीचे निवेदन चव्हाण कुटुंबियांनी शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना दिले.
जळगाव शहरातील चंद्रप्रभा कॉलनीत राहणाऱ्या ओम पंडीत चव्हाण (वय १४) हा शहरातील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. २५ नोव्हेंबर रोजी त्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. ओमच्या आत्महत्येच्या घटनेपुर्वी सुमारे २० ते २५ दिवसांपुर्वी त्याच्या वर्गात शिकणारे वेदांत नाले व हर्षल सोनवणे यांनी देखील गळफास घेवून आत्म्हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. परंतू शाळेतील शिक्षक किंवा कोणीही कर्मचारी अद्याप देखील सांत्पवनपर भेट देण्यासाठी आलेला नाही. त्यामुळे चव्हाणसह त्याच्या दोघ मित्रांच्या आत्महत्येस शाळेतील शिक्षकच जबाबदार असल्याचा आरोप मयताचे वडील पंडीत चव्हाण यांनी केला आहे.
शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांच्या जाचास कंटाळून ओम चव्हाणसह त्याच्या दोघ मित्रांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. तसेच या घटनेची सीआयडीमार्फत चौकशी करुन न्याय देण्याची मागणी पंडीत चव्हाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना निवेदनाद्वारे केली आहे