भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील भाऊंच्या ढाबा जवळ बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून दोन जिवंत काडतूस आणि गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रान उर्फ मॉडल रसूल शेख वय-२१, रा. भारत नगर, भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील भाऊ ढाब्याजवळ मागील बाजूमध्ये संशयित आरोपी इम्रान रसूल शेख हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्यानुसार शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी इम्रान उर्फ मॉडल रसूल शेख वय-२१, रा.भारत नगर, भुसावळ याला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी पो.कॉ. भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रमण सुरळकर करीत आहे.