दुचाकीच्या भीषण अपघातात प्रौढाचा मृत्यू; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

बोदवड लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उभ्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोनोटी फाट्याजवळ घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामचंद्र सिताराम इंगळे वय ४५ रा. उमाळी ता. मलकापूर असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देवानंद समाधान मेढे वय ३१ रा. कंडारी ता. नांदूरा जि. जळगाव हा तरूण व त्याचे मेहुणे रामचंद्र सिताराम इंगळे हे दोघे २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता सोनोटी फाट्याजवळ दुचाकी (एमएच २८ बीटी ५४०७) वर रस्त्याच्या कडेला थांबलेले असतांना समोरून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीयू ८२३७) ने जोरदार धडक दिली. या अपघातात रामचंद्र इंगळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी देवानंद मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक शशिकांत महाले हे करीत आहे.

Protected Content