रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली असून ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेचा कौल मागणार आहेत.
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आ. शिरीषदादा चौधरी हे करत असून त्यांनी यंदा सक्रीय राजकारणातून बाजूला होत आपले पुत्र धनंजय यांच्यासाठी जागा सोडली आहे. खरं तर, धनंजय चौधरी यांच्या उमेदवारीची खूप आधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी घोषणा केली होती. या अनुषंगाने ते झपाटून तयारीला देखील लागले आहेत. अलीकडेच त्यांनी कृतज्ञता संवाद दौऱ्याच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेच्या थेट घरी जाऊन संवाद साधला. याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला. तर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात धडाका लावला आहे.
या पार्श्वभूमिवर, आज काँग्रेस पक्षाच्या जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये धनंजय शिरीष चौधरी यांच्या नावाचा समावेश आहे. ते रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहेत.