डॉ. केतकी पाटलांच्या सौजन्याद्वारे मेहरूण तलाव येथे निर्माल्य संकलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनंत चतुर्दशीदिनी जड अंतकरणाने भाविकांनी आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे विसर्जन शहरातील मेहरूण तलाव येथे केले. या प्रसंगी गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकी ताई पाटील यांच्या सौजन्याद्वारे निर्माल्य संकलन रथ तयार करण्यात आला होता. या समाजपयोगी उपक्रमास गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वर्षी अकरा दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या यात घरगुती, मंडळाचे गणपतीचे विसर्जन मेहरूण तलाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गणेश मूर्तीसोबत फुल, हार, दुर्वा, पान या सारखे निर्माल्य देखील विसर्जनासाठी भाविक घेऊन येत होते. मात्र निर्माल्यामुळे नदी, तलावातील पाणी खराब होते तसेच विर्सजनचे साहित्य काठावर राहून नदी, तलावाचे चित्र खराब दिसते. याकरिता डॉ केतकी ताई पाटील यांनी आपल्या गोदावरी फाऊंडेशन च्या सहकार्याने निर्माल्य संकलन रथ तयार करून घेतला. मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत मेहरूण तलाव येथे १२ जणांची टीम द्वारे निर्माल्य संकलन करण्यात आले. या रथाचे गणेश भक्तांकडून स्वागत करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या नामात रममाण झालेल्या भाविकांनी डॉ. केतकी पाटील यांच्या सौजन्यातून निर्माल्य संकलन रथात देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला.

Protected Content