गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगूरू पदावरून अजित रानडे यांची हकालपट्टी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची शनिवारी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली. संस्थेच्या म्हणण्यानुसार रानडे यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमांचे उल्लंघन करून झाली. रानडे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. संस्थेने रानडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की समितीचे मत आहे की त्यांची निवड ही यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विहित निकषांशी जुळत नाही. त्यामुळे त्यांना कुलगुरू या पदावरून हटवण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना रानडे यांनी ही घटना दुर्दैवी आणि धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

प्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदाच्या नियुक्तीतील गैरव्यवहाराच्या तक्रारींची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांची कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या बाबत जीआयपीईचे कुलपती विवेक देबरॉय यांनी दोन पानांचे पत्र जारी करून रानडे यांना कुलगुरू पदावरून दूर केले आहे. या पत्रात रानडे यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एफएफसीच्या निष्कर्षांचा उल्लेख करण्यात आला असून त्यानंतर तत्कालीन कुलपती राजीव कुमार यांनी २७ जून २०२४ रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शुक्रवारी पुण्यातील जीआयपीई येथे झालेल्या बैठीकीत रानडे यांची बाजू देखील ऐकून घेण्यात आली, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

कुलपती बिवेक देबरॉय यांनी स्थापन केलेल्या चौकशी समितीनुसार, रानडे हे प्राध्यापक म्हणून १० वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवाचा निकष पूर्ण करत नाहीत. रानडे यांना लिहिलेल्या पत्रात देबरॉय यांनी म्हटले आहे की, त्यामुळे तुम्हाला तातडीने पदावरून हटवण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. या बाबत चौकशी समितीने अनेक बैठका घेतल्या. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर समितीने सांगितले की, कायदेशीररित्या रानडे त्यांच्या पदावर राहू शकत नाहीत. यूजीसीच्या नियमांनुसार, नियमांचे उल्लंघन किंवा अक्षमतेचे प्रकरण समोर आल्यास कुलगुरू कुलगुरूंना त्यांच्या पदावरून हटवू शकतात. जीआयपीईचे प्राध्यापक सदस्य मुरली कृष्णा यांनी रानडे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या अध्यापनाच्या अपुऱ्या अनुभवाचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता. यानंतर माजी कुलगुरू राजीव कुमार यांनी रानडे यांना २७ जून रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

त्यांच्या हकालपट्टीवर प्रतिक्रिया देताना रानडे म्हणाले की, गेली अडीच वर्षे मी पूर्ण निष्ठेने आणि माझ्या क्षमतेनुसार काम करत आहे. संस्थेच्या सकारात्मक विकासासाठी हातभार लावला आहे. माझ्या या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. हा निर्णय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. मी माझ्या कारकिर्दीत संस्थेतील सकारात्मक घडामोडींना हातभार लावत आहे. त्याकडे देखील डोळेझाक करण्यात आली आहे.

Protected Content