मुलामुळे बावनकुळे गोत्यात; विरोधक तुटून पडले मागे

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर हिट अँड रन प्रकरणातील ऑडी कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे यांची होती. एवढेच नव्हे तर अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आणखी राजकारण पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिसांनी अपघातानंतर कारमध्ये उपस्थित असलेल्या अर्जुन हावरे आणि रोनित चिंतमवार यांची वैद्यकीय चाचणी केली. मात्र, अद्याप संकेत बावनकुळेची वैद्यकीय चाचणी केलेली नाही. हा मुद्दाही पुढे राजकीय गदारोळाचा कारण बनू शकतो.

नागपूर अपघात प्रकरणी बावनकुळे कुटुंबाचा संबंध नसेल तर लपवाछपवी कशासाठी करत आहात? असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. नागपूर अपघातात गाडी कोण चालवत होते? सीसीटीव्ही फुटेज गायब का करण्यात आले? गाडीची नंबर प्लेट का काढण्यात आली? एफआरआयमध्ये गाडी मालकाचे नाव का नाही? असे प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस गृहमंत्री पदावर राहण्यास लायक नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेतच्या चारचाकीने नागपुरात रविवारी मध्यरात्री दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधीपक्ष विशेषत: शिवसेनेने भाजप आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही घटना काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात घडली आहे. त्यानीही यावर भाष्य केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे घटनेच्या दिवशी संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार हे तिघेही नागपूरच्या धरमपेठ परिसरातील लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमध्ये जेवण करायला गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास तिघे त्या ठिकाणी पोहोचले. अर्ध्या तासानंतर आपल्या ऑडी कारने धरमपेठवरून रामदास पेठेच्या दिशेने निघाले होते आणि त्याच वेळी हा अपघात झाला. पोलिसांनी मद्य प्राशन करून बेदरकारपणे वाहन चालवल्या प्रकरणी अर्जुन हावरेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्याचे सहप्रवासी संकेत बावनकुळे आणि रोनित चिंतमवार यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल केलेले नाही. संकेत बावनकुळे याची तर वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे या मुद्यावर राजकीय गदारोळ होण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून याप्रकरणी गंभीर आरोप होत असले तरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांनी या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करावी आणि सत्य समोर आणावे असे मत व्यक्त केले आहे.

Protected Content