जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात विषारी औषध सेवन केल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अधिक असे की, जळगाव तालुक्यातील आसोदा गावात साजन गायकवाड हा तरूण वास्तव्याला होता. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता साजन गायकवाड हा घरी असतांना त्याने राहत्या घरात विषारी औषध सेवन केले, ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्याने त्याला तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू असतांना गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण हे करीत आहे.