विषारी औषध घेतलेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे या गावातील ४० वर्षीय तरुणाने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष रमेश पारधी वय-४०, रा. कुऱ्हा पानाचे ता. भुसावळ असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा पानाचे गावात संतोष रमेश पारधी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेती काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान बुधवारी 4 सप्टेंबर रोजी त्याने विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावल्याने त्याला भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना दुपारी ३ वाजता त्याचा मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ कैलास बाविस्कर हे करीत आहे.

Protected Content