जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेची बँक खाती उघडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून डीआरएटी न्यायालयातील अपिलात दिरंगाई केल्यामुळे न्यायालयाने पालिकेला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे.
याबाबत वृत्त असे की, महापालिकेने हुडकोकडून घेतलेल्या कर्जप्रकरणी डीआरएटी कोर्टाने ३४१ कोटींची डिक्री ऑर्डर काढली होती. दोन वर्षांपूर्वी हुडकोने डिक्री ऑर्डरनुसार व्याजासह पैसे अदा न केल्यास पुन्हा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी महापालिकेची तीन बँकांमधील सुमारे ४० खाती गोठवली होती. त्यानंतर पालिकेचे डोळे उघडल्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. त्यात गुरुवारी कामकाज झाले. यात डिक्री ऑर्डरप्रकरणी पुन्हा डीआरएटी कोर्टात बाजू मांडण्यासाठी पालिकेचे फेटाळलेले अपील पुनर्जीवित करण्यात आले आहे. तीन महिन्यांत डीआरएटी कोर्टात आपली बाजू मांडून प्रकरण निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले. यादरम्यान हुडकोने अपील पूर्ण होईपर्यंत पालिकेवर कोणतीही कारवाई करू नये. तसेच पालिकेनेही दर महिन्याला तीन कोटी रुपयांचा हप्ता अदा करावा असे आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेकडून अपिलाच्या कामकाजात दिरंगाई केल्यामुळे न्यायालयाने महापालिकेला ५० हजारांचा दंड ठोठावला.