पांझरा नदीला आला पूर; नदीकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील पांझरा नदी पाणलोट क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आहे. त्यामुळे पांझरा नदीला पूर आल्याने या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस तसेच वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून 28274 क्यूसेक विसर्गाने पाण्याचा येवा असल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निम्न पांझरा मध्यम प्रकल्पातून सोमवारी २६ ऑगस्ट रोजी सद्यस्थितीत १८ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आलेला असून पुढील काही तासांत विसर्ग हा ३२ ते ३५ हजार क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

तरी पांझरा नदी काठच्या गावांतील नागरिकांनी तसेच धुळे शहरातील नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी-1, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Protected Content